क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक ; 2 देशी बंदुकासह 11 काडतुसे जप्त

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी सावरगाव-मुरुमगाव मार्गावर एका ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 देशी बनावटीच्या बंदुका आणि 11 काडतुसे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे, घटनेच्या एका दिवसातच पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रामभरोस सिताराम नावाचा ट्रक चालक 20 जुलै 2025 रोजी रात्री सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चिखलात फसला असताना कॅबिनमध्ये झोपला होता. मध्यरात्री 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी त्याला बंदुकीचा धाक दाखवून डिझेल काढण्याची धमकी दिली. डिझेल काढता न आल्याने आरोपींनी त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले.

या घटनेनंतर मुरूमगाव पोलीस ठाण्यात 21 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, सावरगाव येथील उपनिरीक्षक विश्वंभर कराळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने मौजा गजामेंढी, ता. धानोरा येथून अशोक सुखराम बोगा (30), घुमनसाय बैजुराम गावडे (33) आणि सुकालु आसाराम कोमरा (32) या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका छत्तीसगडमधील बसंतकुमार कल्लो याने दुरुस्तीसाठी दिल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी बसंतकुमार कल्लो (41) यालाही 22 जुलै रोजी अटक केली. चारही आरोपींना 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2 देशी बनावटीच्या बंदुका, 11 काडतुसे, चोरीला गेलेला मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विश्वंभर कराळे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा जगदीश पांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button