
बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या बलिदानास वंदन
गडचिरोली : शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग जी यांच्या सुपुत्रांनी — बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांनी धर्मरक्षणार्थ दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आज गडचिरोली येथील भाजपा कार्यालयातील ‘कर्तव्य कक्ष क्र. १’ मध्ये ‘वीर बाल दिवस’ भव्यतेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून बालकांचे शौर्य, देशभक्ती आणि संस्कारांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गुरु गोविंद सिंग जी यांच्या साहिबजाद्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. धर्म आणि सत्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या बालवीरांच्या शौर्यगाथेने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. “कोणत्याही परिस्थितीत सत्याच्या मार्गावरून डगमगायचे नाही आणि अन्यायासमोर झुकयचे नाही,” हा संदेश या प्रसंगी देण्यात आला.
रमेश बारसागडे (जिल्हाध्यक्ष, भाजपा) यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “शौर्य आणि धैर्य या केवळ इतिहासातील गोष्टी नसून, त्या प्रत्येक पिढीसाठी जगण्याचा आदर्श आहेत. आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचे बीज रोवणे ही काळाची गरज आहे.” रमेश भूरसे (मार्गदर्शक) यांनी धर्म, संस्कार आणि देशभक्तीच्या मूल्यांवर भर दिला. कार्यकर्त्यांनी समाजसेवेसाठी आणि धर्मरक्षणासाठी नेहमी तत्पर राहावे, अशी ऊर्जा आपल्या मार्गदर्शनातून दिली. प्रणोती निंबोरकर (नगराध्यक्ष) यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांवर आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला भाजप महिला जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुणघाडकर, बंटी भांगडिया, प्रशांत वाघरे, सागर निंबोरकर आणि मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बालकांचे शिक्षण, त्यांचे संस्कार आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली.
हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा न ठरता, बालकांच्या उज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरला. भाजपाच्या वतीने अशा उपक्रमांतून सातत्याने सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना केली जात असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.



