गोंदियाविदर्भ

सिकलसेल तपासणी शिबीर ; ईंदोरा खुर्द येथे विद्यार्थ्यांची रक्त तपासणी व समुपदेशन

‘विवाहापूर्वी सिकलसेल कुंडली जुळवा’ – आरोग्य सेविका प्रिती वडीचार यांचे आवाहन

तिरोडा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यभर ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत, तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी (डाक) अंतर्गत येणाऱ्या ईंदोरा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबीर उत्साहात पार पडले.

हे अभियान राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये राबविले जात असून, गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथन यांच्या मार्गदर्शनाखाली याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या नियोजनामुळे दुर्गम भागातील नागरिकांना या सेवेचा लाभ मिळत आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रहागडाले व डॉ. मलेवार यांच्या सूचनेनुसार आयोजित या शिबिरात ईंदोरा खुर्द शाळेतील ४० विद्यार्थ्यांची सिकलसेल सोल्युबिलीटी रक्त तपासणी करण्यात आली. केवळ तपासणीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना या आजाराबद्दल सविस्तर समुपदेशनही करण्यात आले.

आरोग्य सेविका प्रिती वडीचार यांनी यावेळी विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून सिकलसेलची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,”सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. रक्ताच्या नात्यात लग्न टाळणे आणि विवाहापूर्वी सिकलसेल कुंडली जुळवणे, हीच हा आजार रोखण्याची खरी गुरुकिल्ली आहे.”

यावेळी उपस्थित पालकांना आणि शिक्षकांना ‘सिकलसेल कार्ड’चे महत्त्व सांगून शासनाकडून मिळणाऱ्या मोफत उपचार आणि सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी आशा सेविका लता रहांगडाले यांचेसह शाळेतील मुख्याध्यापक रिनायत तसेच शिक्षक वृंद निदा आफरीन, भानुमती बघेले, पटले व जवजांळ यांनी सहकार्य केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील एकही बाधित उपचाराविना राहू नये, या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button