
गडचिरोली: कर्करोगाचे वेळेत निदान करून रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन’ला गोंदिया जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३ सप्टेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील कवळेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) आयोजित शिबिरात १४३ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला.
या विशेष व्हॅनमध्ये शहरासह ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या शिबिरात १४३ नागरिकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये ७३ मुख कर्करोग, ३९ गर्भाशयाच्या कर्करोग आणि ३१ स्तनाच्या कर्करोगाच्या तपासण्यांचा समावेश होता. व्हॅनमध्ये असलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे तपासणी अत्यंत सुलभ झाली. मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्रणा उपलब्ध होती.
हे शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा शर्मा, मुखरोग तज्ज्ञ डॉ. प्रणव शेखर, शल्यचिकित्सक डॉ. विनू शर्मा यांच्यासह स्टाफ नर्स उषा निर्विकार, श्रुष्टी शहारे आणि मेश्राम यांनी मोलाचे योगदान दिले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ३२ आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी मोहीम राबवली जात आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच कर्करोगासारख्या गंभीर आजाराची तपासणी करण्याची संधी मिळाली आहे.



