
पोलीस, तलाठी आणि वनरक्षक भरतीसाठी ११३ विद्यार्थ्यांनी तपासली तयारी; ग्रामीण भागातील तरुणांना मोफत सरावाचा लाभ
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दल, ‘प्रोजेक्ट उडान’ आणि यशोरथ सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर क्रमांक ७ यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. आरमोरी येथील श्री संताजी प्रशासकीय महाविद्यालय, अंबामाता महिला महाविद्यालय आणि श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालयात हा सराव पेपर पार पडला.
पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या विविध शासकीय सेवांच्या तयारीसाठी जिल्ह्यातील युवकांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा सराव पेपर घेण्यात आला. यामध्ये एकूण ११८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्वतःच्या तयारीची चाचपणी केली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांना मोफत सरावाची संधी मिळत असून, त्यांचा आत्मविश्वास आणि स्पर्धा परीक्षेतील प्रतिसादक्षमता वाढण्यास मदत होत आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “लेखी सरावामुळे आम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये खूप मदत होते. आम्ही सातत्याने अशा सराव पेपरमध्ये सहभागी होत आहोत.”
सदर सराव परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस हवालदार अशोक ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नाकतोडे तसेच महाविद्यालयाचे प्रा. दौलत धोटे, प्राचार्य फाल्गुन नरूले, प्राचार्य विशाल रंगारी, प्रा. मोहन रामटेके, प्रा. कमलाकर भोयर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या महाविद्यालयांमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे आठ ते नऊ सराव पेपर आयोजित करण्यात येतात. या उपक्रमातून आजवर अनेक विद्यार्थी पोलीस, एसआरपीएफ (SRPF), मिलिटरी व तलाठी पदांवर यशस्वीरीत्या निवडले गेले आहेत. यामुळे येणाऱ्या काळातही असे उपक्रम नियमितपणे राबविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.



