
माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन ; ‘खेळातून राष्ट्रप्रेम व बंधुभाव जागृत व्हावा’
धानोरा : तालुक्यातील मौजा रांगी (जमिदारी) येथील बाजार चौकातील भव्य पटांगणात आदर्श नवयुवक क्रीडा मंडळातर्फे आयोजित भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फित कापून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “खेळ हा केवळ मनोरंजनापुरता नसून त्यातून राष्ट्रप्रेम व बंधुभाव जागृत व्हायला हवा. अंपायरचा निर्णय अंतिम मानल्यास खेळातील वाद टाळता येतील.” प्रत्येक खेळाडूने उत्साह, शिस्त आणि स्फूर्तीने खेळ खेळावा, हीच खरी क्रीडा संस्कृती आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. नेते यांनी रांगी (जमिदारी) येथील माँ शारदा मातेचे दर्शन घेऊन आदर्श शारदा उत्सव मंडळालाही शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजप जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा ज्येष्ठ नेते शशिकांत साळवे, सरपंच फालेश्वरी गेडाम यांच्यासह मुख्याध्यापक हेमंत काटेंगे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष कुलदीप पदा, अजय गेडाम, कैलास मडावी यांच्यासह गावातील नागरिक, युवा वर्ग आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या डे-नाईट कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



