
गोंदिया : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ‘कुष्ठरोग मुक्त भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात ‘परिसस्पर्श कुष्ठरोग अभियान’ राबविले जात आहे. या अंतर्गत अतिदुर्गम व अतिजोखमीच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली, महागाव आणि अर्जुनी या गावांमध्ये जिल्हास्तरीय तपासणी चमूने प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यांत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय चमूमध्ये सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र धनविजय, जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ. मुकेश येरपुडे व अभिषेक भलाई, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांचा समावेश होता. या चमूने गावागावांतील घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. कुष्ठरोगाबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमजुती दूर करत उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच गावात कार्यरत असलेल्या सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव येथे भेट देऊन मोहिमेच्या कामकाजाची पडताळणी केली. त्यानंतर अर्जुनी मोरगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांच्याशी चर्चा करून तालुकास्तरीय परिसस्पर्श अभियानाच्या प्रगतीची माहिती घेतली. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
“सन २०२७ पर्यंत देशात कुष्ठरोगाचा प्रसार शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेतून संशयित रुग्णांची मोफत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकापासून कोणतीही लक्षणे न लपवता खरी माहिती देऊन सहकार्य करावे,” असे आवाहन सहायक संचालक डॉ. महेंद्र धनविजय यांनी केले आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार साखरे, तालुका आरोग्य सहायक सुरेश धुर्वे, पॅरा मेडिकल वर्कर विलास कारेवार, आरोग्य सहायक जे. एस. कत्तूरवार यांच्यासह स्थानिक आरोग्य सेवक, सेविका आणि आशा सेविका उपस्थित होत्या.



