
ठाणा सुपर रोडवर थरारक घटना, वाहतूक विस्कळीत
जवाहरनगर : नागपूर-भंडारा महामार्गावर आज सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. ठाणा सुपर रोडवर एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण चार वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने, ट्रक आणि कारमधील पाच जण सुखरूप बचावले.
ठाणा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुपर रोडवर एक ट्रक उभा होता. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहू ट्रकने या उभ्या ट्रकला धडक दिली. धडकेमुळे उभ्या असलेल्या ट्रकने समोरच्या आणखी एका ट्रकला धडक दिली आणि त्या ट्रकने शेवटी एका कारला धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचे आणि कारचे मोठे नुकसान झाले. दोन्ही वाहनांचे दर्शनी भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाले. अपघातानंतर चौपदरीकरण मार्ग पूर्णपणे बंद झाला.
अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, एकावर एक वाहने आदळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अपघातात कारमध्ये दोन जण होते, तर दोन्ही ट्रकमध्ये तीन जण होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये कुणीही नव्हते. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या दुर्घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. अपघातानंतर वाहतूक तात्काळ सर्व्हिस मार्गाने वळवण्यात आली.



