
सैनिकोत्सव २०२५ क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप ; सुभाषचंद्र बोस हाउस ‘चॅम्पियन’
गडचिरोली : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही तितकाच उत्साह दाखवावा. खेळ हा केवळ मनोरंजन नसून, तो जीवनाचे धडे देणारा एक महान शिक्षक आहे. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित होते. म्हणून आजच्या युगात शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक ताकद असणे तितकेच आवश्यक आहे, आणि ती खेळातूनच प्राप्त होते. क्रीडा म्हणजे फक्त खेळ नाही तर शिस्त, जिद्द आणि संघभावनेचा उत्कृष्ट आविष्कार होय, असे प्रतिपादन १९२ बटालियनचे कमांडंट डॉ. वसंत कुमरे यांनी केले.
सैनिकोत्सव २०२५’ च्या क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरक म्हणून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, तंदुरस्त राहण्यासाठी सर्वांनी रोजच्या व्यस्त कार्यातून किमान दोन तास तरी खेळ खेळायला पाहिजे. सैनिकाच्या जीवनात जशी वेळेची शिस्त, जबाबदारी आणि देशसेवेची भावना असते, तशीच मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात रुजवावीत. खेळामध्येही सैनिकासारखी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. त्यामुळे पराभवाला कधीही घाबरू नका. पराभव हा यशाचा पाया असतो.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, शिक्षक-पालक संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश पोटवार, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी, हरिप्रसाद ध्यानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बलदेवता हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चार दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक वाचन क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.” “आमच्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी भावी सैनिकासारखा शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक बनावा, हीच अपेक्षा आहे. खरा खेळाडू तोच जो पराभवातून शिकतो आणि नव्या जोमाने मैदानात उतरतो,” असे प्रेरणात्मक विचार संग्रामे यांनी व्यक्त केले.
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जास्तीत जास्त पदके आणि ट्रॉफी पटकावणाऱ्या सुभाषचंद्र बोस हाउसच्या विद्यार्थ्यांना व हाउस मास्टरला मान्यवरांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. समारोप करताना डॉ. कुमरे यांनी शिक्षकवृंद आणि आयोजकांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त व सेवाभाव जोपासत प्रगती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वज अवतरण करून क्रीडा ज्योत मालविन्यात आली. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक गजानन अनमुलवार व योगेश आसमवार यांनी केले तर आभार रहीम पटेल यांनी मानले.



