गडचिरोलीविदर्भ

ग्रामीण खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ: गोरेगाव केंद्रात ‘अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा’चा प्रारंभ

माजी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते उद्घाटन ; सर्वांगीण विकासासाठी महोत्सव महत्वाचा

गोरेगाव : गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित ‘अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५’ च्या गोरेगाव केंद्रस्तरीय स्पर्धांचा उद्घाटन सोहळा बुधवार, १० डिसेंबर रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, पिंडकेपार येथे अत्यंत उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री पंकज रहांगडाले यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा महोत्सव जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर यशस्वीपणे राबविला जात आहे.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पंकज रहांगडाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत महोत्सवाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. “फक्त शालेय अभ्यासक्रम नाही तर क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवावे, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुलांना आपली कला व कौशल्ये मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते,” असे मत रहांगडाले यांनी व्यक्त केले.

केंद्रस्तरीय स्पर्धांमधून निवड झालेले स्पर्धक लवकरच जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतील. उद्घाटन सोहळ्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आकर्षक संचलन आणि पीटी ड्रिल सादर केले. तसेच, कलावंत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व लावणीच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी व्यासपीठावर डॉ. लक्ष्मण भगत, सरपंच योगिता शहारे, राजेंद्रनाथ मेश्राम, डॉ. निधी चौधरी, मुख्याध्यापक पी. डी. पटले, केंद्र शिक्षण विस्तार अधिकारी एस. जे. हरीणखेडे यांच्यासह गोरेगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button