
नोबेल विजेते कैलास सत्यार्थी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन
नागपूर: कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, विदर्भ यांच्यावतीने आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत ‘एकलव्य एकल विद्यालय’ च्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ४ ते ७ सप्टेंबर या चार दिवसीय प्रशिक्षण वर्गात शिक्षकांना त्यांच्या कार्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, आमदार संजय पुराम, आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले, संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, माजी आमदार केशवराव मानकर, नागपुरच्या माजी महापौर माया इवनाते, रेखा मावस्कर, संजय भेंडे, संजय फांजे, उपाध्यक्ष राजीव हडप, मुरलीधर चांदेकर, सचिव प्रशांत चोपर्डीकर, कोषाध्यक्ष मिलिंद कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोप सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी म्हणाले, “मला मिळालेला नोबेल पुरस्कार हा केवळ माझा नसून भारतातील प्रत्येक नागरिकाचा आहे. हा पुरस्कार मी भारतमातेच्या चरणी अर्पण केला आहे.” जगात १४४ देशांमध्ये फिरताना आलेले अनुभव आणि अनेक अडचणींवर मात करून समाजकार्याचा मार्ग न सोडण्याचा सल्ला त्यांनी दिला. “रवींद्रनाथ टागोर आणि सी. व्ही. रमण यांच्यानंतर मला मिळालेला हा सन्मान सर्व भारतीयांचा आहे असे मानून मी तो राष्ट्रपती भवनातच अर्पण केला,” असे त्यांचे शब्द ऐकून उपस्थित शिक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व प्रेरणा संचारली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कै. लक्ष्मणराव मानकर यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “मानकरजींनी आयुष्यभर वंचित, दलित आणि शोषित घटकांसाठी निःस्वार्थपणे काम केले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.” ते पुढे म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष गुण असतो, आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्याचा विकास करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”
गडकरींनी एका प्रभावी उदाहरणाद्वारे आपले विचार मांडले. ते म्हणाले, “सूर्य मावळला, चंद्र लुप्त झाला, तारे हरवले तरी दिवा म्हणतो- ‘माझे कार्य आहे उजेड देण्याचे, प्रकाश पसरवण्याचे.’ त्याचप्रमाणे आपणही शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून अंधारात प्रकाश पसरवण्याचे कार्य अखंडपणे करत राहिले पाहिजे.” त्यांच्या या भाषणाने उपस्थितांना शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधिक प्रभावीपणे पटवून दिले.
एकलव्य विद्यालयांचे हे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून, आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारे आहे. या प्रशिक्षण वर्गामुळे शिक्षकांना नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या कार्याला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे.



