
भंडारा : जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘खो-खो महासंग्राम’ स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निलज (खुर्द) च्या विद्यार्थिनींनी आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातील या मुलींनी दाखवलेला वेग, चपळता आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर मोठ्या शाळांच्या संघांना नमवत स्पर्धेत एक वेगळीच छाप पाडली आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत निलज (खुर्द) शाळेतील अनिशा बोन्द्रे, आदिती कुकडे, माही पिंगरे या तीन गुणवान खेळाडूंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडू आता राज्य पातळीवर भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. एका छोट्याशा गावातून थेट राज्यस्तरापर्यंत मजल मारल्याने संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.
निलज (खुर्द) च्या संघाने अत्यंत शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. या संघात आराध्या भोयर, आस्था भोयर, साक्षी पंचबुधे, रागिणी मोहतुरे, अनुष्का बोन्द्रे, स्वरा कुकडे, विधी पिंगरे, समृद्धी हिंगे, अश्लेषा भोयर, उन्नती मोहतुरे आणि पूजा तितीरमारे या खेळाडूंचा समावेश होता. सर्वांनी एकजुटीने खेळत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली.
या घवघवीत यशामागे क्रीडा प्रशिक्षक शोभारामजी तितीरमारे आणि डेव्हिड आगाशे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक पवार, श्रीकृष्ण भोयर, अरुण भोयर आणि सीमा मोहतुरे यांनी खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवले.
ग्रामीण भागातील मुलींनी खेळाच्या मैदानात मिळवलेल्या या यशामुळे निलज (खुर्द) गावात दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळत आहे. या मुलींची जिद्द आणि आत्मविश्वास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी अशीच चमकदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा ग्रामस्थांनी दिल्या आहेत.



