गडचिरोलीविदर्भ

जिल्हाधिकारी पंडा थेट शेतीच्या बांधावर ; मुलचेरा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी

शेतकऱ्यांशी साधला संवाद, पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश ; १० लाभार्थ्यांना निवासी पट्टे वाटप

गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकताच मुलचेरा तालुक्यात थेट दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची स्थिती आणि नुकसानाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे पूर्ण करून शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीतील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली आणि मदत व पुनर्वसन उपाययोजनांबाबत चर्चा केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम. व तहसीलदार चेतन पाटील उपस्थित होते.

सेवा पंधरवड्या अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या अभियानात जिल्हाधिकारी यांनी सन २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील घरांना नियमित करण्याच्या प्रक्रियेत मुलचेरा तालुक्यातील निवडक १० लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमनाखाली पट्टे वाटप केले. तालुक्यात ६७ लाभार्थ्यांना निवासी पट्टे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार पाटील यांनी यावेळी दिली.

दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. त्यांनी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन महसूल व सेवा पंधरवडा उपक्रमांची प्रगती तपासली. याशिवाय शासकीय आश्रम शाळा, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा विवेकानंदपूर तसेच एकलव्य मॉडेल स्कूल येथे भेट देवून पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button