गडचिरोलीविदर्भ

तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर रानडुकरांचा हल्ला ; दोन दिवसांत तीन महिला जखमी

कोरची : तालुक्यात रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांना लक्ष्य केले जात आहे. बिहिटेकला येथे एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी (दि.९)   बेतकाठीच्या जंगलात आणखी दोन महिलांवर रानडुकरांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निराशा रवींद्र गुरवले (वय ३०) आणि नंदकुमारी तेजराम बघवा (वय ४०) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही महिला बेतकाठीच्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक रानडुकराने निराशा गुरवले यांच्यावर हल्ला केला, ज्यात त्यांचे दोन्ही पाय आणि कंबर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

याच ठिकाणी बुधवारी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या नंदकुमारी बघवा यांच्यावरही रानडुकराने हल्ला केला. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याने भुंकल्यामुळे रानडुक्कर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच बेळगावच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी तातडीने जखमी महिलांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तेंदूपत्ता कंत्राटदार आणि ग्रामसभेत झालेल्या करारानुसार, तेंदूपत्ता संकलनादरम्यान कोणत्याही मजुराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना दीड लाख रुपये आणि जखमी झाल्यास ५० हजार रुपये औषधोपचारासाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे जखमी महिलांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे. दोन दिवसात तीन महिलांवर रानडुकरांनी हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button