भंडाराविदर्भ

अंगावर स्लॅबचे छत कोसळल्याने मजुराचा मृत्यू

सोनी येथील घटना

लाखांदूर : मोकडळीस आलेले घर आणि स्लॅबचे छत व्हायब्रेटर मशीनने पाडण्याचे काम सुरू असतानाच छत अंगावर कोसळले. त्यात २५ वर्षीय मजुराचा दबून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सोनी या गावात घडली. प्रफुल प्यारेलाल रामटेके नामक हा मजूर गडचिरोली तालुक्यातील वडसा (हेटी) येथील राहणारा होता. गुरुवारी २५ जुलैच्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सोनी येथील प्रियकांता गोपीचंद बावणे यांचे घर जीर्ण झाल्याने पावसाळ्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी ते पाडण्यासाठी मजुरांना काम दिले होते. यासाठी व्हायब्रेटर मशीनच्या साहाय्याने घर पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (हेटी) येथील प्रफुल प्यारेलाल रामटेके याला पाचारण केले होते. हाताला मिळेल ती मजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या प्रफुल्लला हे काम मिळाल्याने त्याने एका व्यावसायिकाकडून विजेवर चालणारी घर पाडण्याची व्हायब्रेटर मशीन भाड्याने आणली होती सोबत मदतनीस म्हणून एकाला कामावर घेतले होते. सकाळपासून हे काम सुरू होते. दरम्यान, व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडत असताना मदतनीस युवक काही कामानिमित्त बाहेर गेला तरीही काम लवकर संपावे यासाठी प्रफुल्लने व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घराचे छत पाडण्याचे काम सुरू ठेवले. मात्र, घर जीर्ण झाले असल्याने घराची स्लॅब व भिंत अंगावर पडून प्रफुलचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गोपाल कोसरे, नायक संदिप बावनकुळे, अंमलदार राहुल कोटांगले यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. या घटनेची माहिती स्थानिक सोनी येथील तलाठी आशिष खामनकर, ग्रामसेवक विलास मुंढे, कोतवाल मंगेश सुखदेवे व सरपंच कुंता शहारे यासह अन्य ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button