
सेवानिवृत्तीपर सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सपत्नीक सत्कार
गडचिरोली : अबुझमाड शिक्षण संस्था, गडचिरोलीचे सचिव तथा भगवंतराव हायस्कूलचे प्राचार्य शमशेर खान पठाण यांनी शिक्षणाला सर्वस्व मानून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या घराघरात शिक्षणाची गंगा पोहोचवली आणि सामाजिक कार्यातही महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे हे बहुमूल्य योगदान प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद कात्रटवार यांनी काढले.
प्राचार्य शमशेर खान पठाण हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानिमित्त, शहरातील धानोरा मार्गावरील महाराजा हॉलमध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अरविंद कात्रटवार यांच्या वतीने शिवसैनिकांच्या उपस्थितीत प्राचार्य शमशेर खान पठाण आणि त्यांच्या अर्धांगिनी प्राचार्य लिना हकीम यांचा सत्कार करण्यात आला.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, शिक्षण संस्था केवळ शिक्षणापुरत्या मर्यादित न राहता, त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. पठाण सरांनी अबुझमाड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर अधिक भर दिला, ज्यामुळे त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत आणि यशोशिखर गाठत आहेत. त्यांचे उत्तम शैक्षणिक व्यवस्थापन आणि मार्गदर्शन यासाठी कारणीभूत ठरले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान बहुमूल्य असल्याचे नमूद करत कात्रटवार यांनी सेवानिवृत्तीनंतरही पठाण सरांच्या हातून चांगले कार्य घडत राहील, असा आशावाद व्यक्त केला आणि पुढील जीवनवाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य शमशेर खान पठाण यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या अर्धांगिनी प्राचार्य लिना हकीम यांनी, पठाण सरांचे मिळालेले पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे सांगितले.
सत्कार सोहळ्याला यादव लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, तेजस धंदरे, रंजीत वलादे, सचिन मडावी, मधुकर बावणे, सुरज वलादे, संदिप नरुले, मनोहर निलेकार, विशाल गुरनुले, जितेंद्र निकोडे, राजेंद्र मेश्राम, गणेश ठाकरे, अमोल चौधरी, शुभम चंद्रगिरे, आरीफ ढवळे, साहिल कारेते, रमेश आवारी, फाल्गुन समर्थ, अमर सोरते, समिर राऊत, अक्षय समर्थ, शुभम अंबादे, चुडाराम राऊत, दिपक राऊत, अजित आजबले, त्रिशुल ठाकरे, वेदांत कस्तुरे, सुरज वाघाडे, रमेश आवारी, तुमदेव आवारी, सुनिल कोसमशिले यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



