
गणपूरजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
गोंडपिपरी :चंद्रपूर-अहेरी मार्गावरील गणपूरजवळ शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात संदीप कुळमेथे आणि रमेश वाढई (दोघे रा. कोठारी) अशी मृतकांची नावे आहेत. तर गणेश मडावी (रा. कवडजई) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोठारी येथून किराणा सामान घेऊन पिकअप (एमएच ३४ बीजी ८८९९) गोंडपिपरीकडे निघाली होती. या पिकअपमध्ये संदीप कुळमेथे, रमेश वाढई आणि गणेश मडावी हे तिघे जण प्रवास करत होते. गोंडपिपरी येथून बल्लारपूरकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ४० डीएफ १४३७) पिकअपची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, पिकअपमधील दोघा प्रवाशांचा जागीच अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कोठारी पोलीस पुढील तपास करत आहेत.



