
१ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याची संधी ; ‘जनगणनेतून जनकल्याण‘ ब्रीदवाक्य सार्थ करण्याचे आवाहन
गोंदिया : जिल्ह्यात १ मे पासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून, यंदा नागरिकांसाठी ‘स्वगणना’ (Self Enumeration) हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्याचे प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्वतःची स्वगणना करून या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती वेब पोर्टलच्या माध्यमातून सुरक्षितपणे भरता येणार आहे. स्वगणनेचा पर्याय १ मे ते १५ मे २०२६ पर्यंत उपलब्ध असेल. नागरिकांनी स्व-गणनेसाठी https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करावा. ऑनलाईन माहिती भरल्यानंतर प्राप्त झालेला Self Enumeration ID जतन करून ठेवावा. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांच्याशी हा आयडी शेअर करणे आवश्यक आहे.
जनगणनेचा प्रत्यक्ष पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबवला जाणार आहे. घरोघरी भेट: या काळात प्रगणक नागरिकांच्या घरी जाऊन एकूण ३३ प्रकारचे प्रश्न विचारतील. डिजिटल नोंदणी: ही सर्व माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे.
जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ती भविष्यातील लोककल्याणकारी योजनांच्या नियोजनाचा आधार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जनगणना कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. ‘जनगणनेतून जनकल्याण’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.



