भंडाराविदर्भ

शासकीय आयटीआयमध्ये नवीन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू; ‘सोलर टेक्निशियन’साठी ऑगस्टपासून प्रवेश

सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन निर्णय

भंडारा : राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) साकोली येथे नवीन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) न्यू एज कोर्स’ असे या अभ्यासक्रमाचे नाव असून, त्याची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विजय लाकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर ऊर्जेचे नवीन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच, केंद्र सरकार ‘पी.एम. सूर्यघर’ योजनेची अंमलबजावणी करत असल्याने या क्षेत्रात तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी राज्यातील निवडक आयटीआयमध्ये हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्यामुळे, २८ जुलै रोजी केंद्रीय प्रशिक्षण महानिदेशालय, नवी दिल्ली यांच्याकडून या अभ्यासक्रमाला संलग्नता प्राप्त झाली आहे.

‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)’ या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष आहे. या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साकोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन विजय लाकडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button