
आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा वापर ; ३८० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परीक्षण
गोंदिया : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून आयुर्वेद चिकित्सकांकडून 18 ते 70 वर्षे वयोगटांतील 18 हजार 695 नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. लोकांचे प्रकृती परीक्षण करून प्रकृतीनुसार आहार कोणता घ्यावा, दैनंदिन जीवनशैली कशी असावी, याबद्दल मार्गदर्शनासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्यावतीने सदर अभियान राबवून प्रकृती परीक्षण झाल्यावर संबंधितांना विनामूल्य प्रकृती प्रमाणपत्र देण्यात आले. 23 डिसेंबरला जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकृती परीक्षण प्रकृती अॅपद्वारे करण्यात आले. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांचेही प्रकृती परिक्षण करण्यात आले.
यासाठी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, डॉ. प्रशंसा वैद्य, डॉ. महेंद्र संग्रामे, डॉ. नीलम कुथे यांनी परिश्रम घेतले. जिल्ह्यात आयुष विभाग, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, एम. एस. आयुर्वेद महाविद्यालयाच्या एकत्रित समन्वयाने देश का प्रकृती परीक्षण कार्यक्रमांतर्गत एकूण 18 हजार 695 रुग्ण व स्वस्थजनांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले.
जिल्ह्यात आयुष विभाग. आयुर्वेदिक दवाखान्यांच्या अधिनस्त वैद्यकीय अधिकारी अशा एकूण 380 अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकृती परीक्षण प्रकृती अॅपद्वारे करण्यात आली. या अभियानात आयुष कार्यक्रमांत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, एम. एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.



