
प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने ‘ताला ठोको’चा प्रयत्न ; उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा कायम
अहेरी : महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावीत या न्याय्य मागणीसाठी अहेरीत सोमवार, २९ जून रोजी चांगलेच राजकीय व सामाजिक वातावरण तापले. नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या तीव्र ‘ताला ठोको’ आंदोलनावर पोलिसांनी धडक कारवाई करत आंदोलनकर्त्यांना रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. रुग्णालयाला कुलूप ठोकण्यासाठी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी तत्परता दाखवत नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्यासह चार प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रुग्णालयातील संभाव्य तणाव टळला असून आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहिली.
महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या संदर्भात नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी २२ जून रोजी उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. २८ जूनपर्यंत यावर कोणतीही सकारात्मक कारवाई न झाल्यास २९ जून रोजी ‘ताला ठोको’ आंदोलन आणि त्यानंतरही तोडगा न निघाल्यास ३० जूनपासून ‘राजे विश्वेश्वरराव महाराज चौक’ येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा स्पष्ट इशारा आधीच देण्यात आला होता.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सकाळी ठीक ११ वाजता अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते महिला व बाल रुग्णालयात धडकले. रिक्त पदे तातडीने भरावीत आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी रुग्णालय परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. डी. मडावी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि थेट आरोग्य विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे थेट संवाद घडवून आणला. मात्र, या संभाषणातही पदभरतीबाबत कोणतेही ठोस लेखी किंवा तोंडी आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय कायम ठेवला.
आंदोलनकर्ते कुलूप लावण्यासाठी रुग्णालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून रोखले. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय परिसरात आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी अमोल मुक्कावार यांच्यासह चार जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी जरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला, तरी लोकहिताचे हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा अमोल मुक्कावार यांनी घेतला आहे. “प्रशासनाने तातडीने रिक्त पदांवर नियुक्ती केली नाही, तर आधीच ठरल्याप्रमाणे ३० जूनपासून ‘राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात’ आमरण उपोषण सुरू केले जाईल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग काय पावले उचलते, याकडे अहेरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



