
घोटसुर या आदिवासी गावाचे यशस्वी प्रयत्न
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या ९० टक्के आदिवासी समुदायाच्या घोटसुर या गावात मागील वर्षभरापासून अवैध दारूविक्री बंद आहे. त्यामुळे पूर्वी गावातील ग्रामसभा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये मद्यपींमुळे होणारा गदारोळ थांबला आहे. यासाठी ग्रामपंचायत, मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी यशस्वी प्रयत्न केले आहे.
एटापल्ली तालुका शहरापासून ४५ किमी अंतरावर अतिशय दुर्गम भागात वसलेले घोटसुर हे गाव आहे. गावात १ ली ते ८ वा वर्ग पर्यंत शाळा आहे. एक अंगणवाडी केंद्र व आरोग्य उपकेंद्र आहे. गावाची लोकसंख्या ६५५ आहे असून ९० टक्के लोक आदिवासी समुदायाचे आहेत. गावात तीन दारू विक्रेते देशी, विदेशी दारू विक्री करत होते. तसेच १५ ते २० घरी घरघुती मोहाची दारू काढून विक्री करत होते. गावात दारू विक्री वाढल्याने ग्रामपंचायती मधील ग्रामसभेत नेहमी भांडण होत होते. महिलावरील घरघुती हिंसाचार वाढलेला होता. दारूविक्रीमुळे ग्रामस्थ व महिलांना अतोनात मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
गावातील दारू बंद करण्यासाठी मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटना बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ ग्राम पंचायत समिती सदस्य सरपंच साधू कोरामी. पोलिस पाटील लक्ष्मी नरोटे, जयश्रीताई कोपूलवार व मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटना सदस्य असे एकूण ५५ महिला उपस्थित होत्या. गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याबाबत मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनतर गावात किंवा परिसरात अवैद्य दारू विक्री केल्यास १० हजार रुपये दंड व पोलिस केस करण्याचा सामूहिक निर्णय घेणयात आला. या निर्णयाला काही विक्रेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु, महिलांनी पुढाकार घेत त्यांचा आवाज बंद केला. सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी झाल्याने घोटसुर येथे मिळणारी अवैध दारू बंद झाली. गावातील दारूबंदीमुळे गावात शांतता निर्माण झाली. गावातील महिलावरील घरघुती हिंसाचारात घट झाली. ग्राम सभा व प्रशासकीय कामे सुरळीत व्हयायला लागल्याने घोटसुर गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. घोटसुर गाव १ वर्षापासून पूर्णतः दारुमुक्त गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.



