चंद्रपूरविदर्भ

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी भर पावसात चक्काजाम आंदोलन

शहर कडकडीत बंद ; जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक व सुटका

ब्रम्हपुरी : गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीला घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रम्हपुरी तालुका जिल्हा निर्माण कृती संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. तरी मात्र शासन सदर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. समितीच्या वतीने मागील आठवड्याभरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुद्धा सुरू केले आहे. परंतु सदर साखळी उपोषणाची दखल न घेतल्याने हा लढा तीव्र करण्यासाठी 24 जुलै रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी व ख्रिस्तानंद चौकासह शहरातील विविध चौकात तब्बल दोन तास समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन केले.

यावेळी ब्रम्हपुरी शहरात कडकडीत बंद पाळला व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महविद्यालय सुद्धा यावेळी बंद होते. याप्रसंगी ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना ब्रम्हपुरी जिल्हा मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी भर रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आणखी परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यानंतर पोलीस स्टेशन येथे नेऊन आंदोलकाची सुटका करण्यात आली. ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी येत्या काही दिवसात शासनाने पूर्ण न केल्यास 15 ऑगस्टला आत्मदहन करू असा थेट इशारा शासनाला ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आंदोलनात जिल्हा संयोजक विनोद झोडगे,  निमंत्रक प्रशांत डांगे,अविनाश राऊत, सूरज शेंडे, प्रा. देविदास जगनाडे, हरीचंद्र चोले, राजू भागवत, मिलिंद भनारे, मंगेश फटीग, सुयोग बाळबुधे, अमित रोकडे, कोकोडे, इकबाल कुरेशी, लीलाधर वंजारी, दीपक नवघडे, डॉ. प्रेमलाल मेश्राम, सुनील विखार, पवन मगरे, भाऊराव भजगवळी, रक्षित रामटेके, विहार मेश्राम, जीवन बागडे, शब्बीर अली, फारूक बकाली, दत्तू टिकले, दत्ता येरावार यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button