गडचिरोलीविदर्भ

कोरची-सातपुती मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; शालेय विद्यार्थ्यांसह वाहनचालकांचा जीव टांगणीला

कोरची: कोरची-सातपुती मुख्य मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे आता जीवघेणे ठरत आहे. पावसाळ्याच्या आगमनानंतर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना रोजच अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हा मार्ग कोरची मुख्यालयाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने आणि सायकलस्वार या मार्गाचा वापर करतात. मात्र, पावसामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनांचे संतुलन बिघडून अनेक अपघात घडत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सातपुती परिसरातील गावे, शेतकरी आणि व्यापारी वर्गाची मोठी वर्दळ असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्ड्यांमुळे होत असलेल्या त्रासामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र असंतोष पसरला आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे सुरक्षित हित लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की पावसाचे पाणी साचल्यानंतर ते दिसतच नाहीत. आता शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही सायकलने जाताना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी.

– विलास होळी, नागरिक सातपुती

या मार्गाने दररोज प्रवास करावा लागतो. खड्डे चुकवताना अनेकदा वाहन घसरते. अनेक वेळा संबंधित विभागाला कळवूनही दखल घेतली जात नाही. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे.

– सौरब बाजपेई, वाहनचालक, गणेशपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button