गडचिरोलीविदर्भ

ग्रामसभांचे आर्थिक सक्षमीकरण होणे काळाची गरज – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

चिंचगुंडी येथे ‘एकल ग्रामसभा प्रशिक्षण’ कार्यक्रम

अहेरी : “पेसा आणि सामूहिक वन हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट सुविधा निर्माण होतील. यातूनच ग्रामसभांचा शाश्वत विकास साध्य होईल,” असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे आयोजित ‘एकल ग्रामसभा प्रशिक्षण’ कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामसभांच्या सक्षमीकरणासाठी हा सात दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या सात दिवसीय प्रशिक्षणात ग्रामसभा प्रतिनिधींना पेसा, सामुहिक वन हक्क कायदा, रोजगार हमी कायदा, गौण वन उपज, वन व्यवस्थापन व वन संरक्षण आराखडा तसेच ग्रामसभांचे रेकार्ड व अंकेक्षण या विषयांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. चिंचगुंडी येथे पार पडलेल्या ८५ व्या तुकडीच्या या प्रशिक्षणात अहेरी व एटापल्ली तालुक्यातील २० ग्रामसभांमधील ८६ महिला व पुरुष प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कुलगुरू डॉ. बोकारे पुढे म्हणाले की, “पेसा आणि सामूहिक वन हक्क हे कायदे थेट आपल्या जीवनाशी निगडित आहेत. येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या कायद्यांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी येथे घेतलेले ज्ञान आपल्या ग्रामसभेतील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावे.”

या कार्यक्रमाला मिताली आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम आणि एकल ग्रामसभा समन्वयक डॉ. नरेश मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहयोगी मित्र चंद्रकांत किचक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button