
गडचिरोली : शहरालगतच्या पोटेगाव-गुरवळा मार्गावर रविवारी सकाळी ९.३० वाजता दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक तरुण जागीच ठार झाला, तर दोन अल्पवयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात आणखी दोन युवक किरकोळ जखमी झाले असून, या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राकेश प्रभाकर मुनघाटे (वय ३०, रा. कुराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गडचिरोलीहून कामानिमित्त कुराडीच्या दिशेने जात होता. त्याच्यासोबत दुर्योधन विलास चौधरी आणि छत्रपती विनायक चौधरी हे दोघेही गडचिरोलीतील होते. समोरून भरधाव वेगात आलेल्या स्कुटीला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत राकेशचा जागीच मृत्यू झाला, तर सोबतचे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
दुसऱ्या स्कुटीवर असलेल्या अनुष्का आणि अक्षरा (दोघी वय १५, रा. गडचिरोली) या शालेय विद्यार्थिनी आहेत. त्या ट्युशननंतर शहरालगतच्या जंगल रस्त्यावर फोटोसेशनसाठी गेल्या होत्या. परतताना भरधाव स्कुटी थेट राकेशच्या दुचाकीवर आदळली. धडकेमुळे दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यापैकी अनुष्काची प्रकृती गंभीर असून, तिला नागपूरला हलविण्याची तयारी सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत रुग्णवाहिका व पोलिसांना पाचारण केले. सर्व जखमींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामागे वाहनांचा बेफाम वेग, रस्त्याची अरुंदता आणि अल्पवयीनांकडून वाहन चालवले जाणे ही मुख्य कारणे असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गडचिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



