भंडाराविदर्भ

अमृत मेळाव्यात उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा

महिला सक्षमीकरणावर विशेष भर

भंडारा: खुल्या प्रवर्गातील व्यावसायिक आणि व्यवसायोत्सुक युवक-युवतींसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेचा विशेष ‘अमृत मेळावा’ भंडारा येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि उद्योजकतेच्या संधींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

नागपूर विभागाचे व्यवस्थापक देवदत्त पंडित यांनी अमृत संस्थेच्या योजनांचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण उपासनी यांनी बँकिंग योजनांचा लाभ घेऊन उद्योजक आपला व्यवसाय कसा वाढवू शकतात, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या विषयावर स्नेहल खानापूरकर यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांतून महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी सदानंद पातुरकर यांनी वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा, तर सिम्मी बुधवानी यांनी ‘अमृतपेठ’ या डिजिटल खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून झालेल्या फायद्याचे अनुभव सांगितले. सिम्मी बुधवानी यांनी ‘अमृतपेठ’ हे उद्योजकांसाठी एक सक्षम व युजर-फ्रेंडली डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याचे यावेळी नमूद केले.

जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास, अमृत मित्र हेमंत चंदवासकर आणि अमृत सखी साक्षी जोशी यांनी या मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले. या मेळाव्यामुळे भंडाऱ्यातील उद्योजक व महिला गटांना नव्या संधींची माहिती मिळाली असून, आगामी काळात उद्योजकतेला निश्चितच नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button