
तुकडोजी चौकातील घटना
आमगाव : शहरातील तुकडोजी चौकात असलेल्या किराणा दुकानाला आग लागून त्यात आठ लाख रुपयांचा माल जळून राख झाला. सोमवारी (दि. २५) पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नसून, शॉटसर्किटमुळे आग लागली असावी, असा कयास लावला जात आहे.
शहरातील तुकडोजी चौकात राजेश असाटी यांचे महेश किराणा स्टोअर्स नावाने दुकान आहे. सोमवारी (दि. २५) पहाटे ५ वाजता इन्व्हर्टरच्या आवाजाने त्यांना जाग आली. यावर ते वरच्या माळ्यावरील त्यांच्या घराच्या बाल्कनीत आले तेव्हा त्यांना धुराचे लोळ उठताना दिसले. घाबरून खाली उतरल्यावर आपल्याच दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांनी दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. लोकांनी तातडीने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले व सुमारे अर्धा तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत दुकानातील सर्व सामान व फर्निचर जळून राख झाले होते.
या घटनेत त्यांचे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती तलाठी व स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली. दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास करण्यात येत आहे.



