
गडचिरोली : बँकिंग क्षेत्रातील ‘मानवता’ हरवल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पोर्ला येथे समोर आला आहे. औषधोपचारासाठी स्वतःचेच पैसे काढण्याकरिता एका कोमात असलेल्या वृद्ध महिलेला चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारापर्यंत आणण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली. बँक व्यवस्थापनाच्या या आडमुठ्या आणि असंवेदनशील धोरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने त्यांची मुलगी व जावई २५ फेब्रुवारी रोजी बँकेत गेले होते. वृद्धेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे देण्याची विनंती नातेवाईकांनी केली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने नियमांवर बोट ठेवत “खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही”, अशी ताठर भूमिका घेतली.
नियमानुसार, खातेदार गंभीर आजारी असल्यास मेडिकल सर्टिफिकेट घेऊन पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित असताना, व्यवस्थापकाने हतबल नातेवाईकांना वारंवार परत लावले. अखेर नाइलाजास्तव नातेवाईकांनी खाजगी वाहन भाड्याने करून कोमात असलेल्या शांताबाईंना बँकेच्या दारात आणले.
पोर्ला शाखेचा कारभार केवळ असंवेदनशीलच नाही, तर संशयास्पदही असल्याचे समोर आले आहे. बनावट स्वाक्षरी प्रकरण: अवघ्या आठ दिवसांपूर्वी वसा येथील एका खातेदाराच्या खात्यातून बँकेतील कर्मचाऱ्यानेच बनावट सही करून पैसे लांबवले होते. तक्रार केल्यानंतर ते पैसे परत मिळाले, मात्र यामुळे बँकेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकारी वर्गाचा उद्धटपणा: शाखा व्यवस्थापक आणि उपशाखा व्यवस्थापक हे सर्वसामान्य ग्रामीण खातेदारांशी अत्यंत असभ्यपणे वागतात, अशा तक्रारींचा पाढाच नागरिकांनी वाचला आहे.
बँकेच्या या मनमानी कारभाराचा फटका संपूर्ण परिसराला बसत आहे. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पोर्ला ग्रामसभेत या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. मात्र, उच्च पदस्थ बँक प्रशासनाने अद्याप कोणतीही पावले न उचलल्याने संताप द्विगुणित झाला आहे.
“पोर्ला शाखेतील तीनही जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त खातेदारांनी दिला आहे.



