गडचिरोलीविदर्भ

अहेरी विधानसभा क्षेत्रात ‘बळीराजा शेत-पांदण रस्ते’ योजनेला मिळणार गती!

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा : २०२६-२७ या वर्षातील कामांचे नियोजन; सिरोंचातील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात

अहेरी : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारमाही, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजने’च्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन करण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अहेरी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शेत-पांदण रस्त्यांच्या कामाला गती देऊन ती वेळेत व अत्यंत दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश आमदारांनी यावेळी प्रशासनाला दिले.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांच्यासह अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षात कोणत्या गावांमध्ये, कोणत्या क्लस्टरनुसार आणि कोणत्या प्राधान्यक्रमाने पांदण रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, यावर सविस्तर मंथन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील स्थानिक गरजांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार आत्राम यांनी दिले.

विशेष म्हणजे, २०२५-२६ या आर्थिक वर्षात सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पांदण रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यापैकी बहुतांश कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. यापूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे. पात्र कंत्राटदारांची निवड प्रक्रिया पार पडल्याने कामांना वेग आला आहे. याच धर्तीवर भामरागड, मुलचेरा, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यांत नवीन रस्त्यांची निवड करणे, क्लस्टरनिहाय नियोजन आखणे, पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करणे आणि प्रत्यक्ष कामे वेळेत पूर्ण करणे याबाबत सखोल रणनीती ठरवण्यात आली.

“मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजना ही ग्रामीण भागातील बळीराजासाठी अत्यंत संजीवनी ठरणारी योजना आहे. यामुळे शेतापर्यंत बारमाही रस्ता मिळून कृषी यंत्रसामग्रीची वाहतूक सुलभ होते. शेतीमालाची बाजारापर्यंत वाहतूक जलद झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि उत्पादन खर्च वाचतो. त्यामुळे ग्रामीण दळणवळणाला चालना मिळून गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो. म्हणूनच अधिकाऱ्यांनी या कामांमध्ये कसलाही दिरंगाई न करता ती तातडीने पूर्ण करावीत,” असे निर्देश आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button