महाराष्ट्रमुंबई

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी अहवाल अधिवेशनापूर्वी सादर करण्याची वडेट्टीवारांची मागणी

४० लाखांची व्हॅन दुप्पट-तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप; अध्यक्षांकडून अहवालाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दुप्पट ते तिप्पट दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा दावा करत, याची तातडीने चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, “एका कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची किंमत ४० लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही आणि त्यामधील यंत्रणा १२ लाखांपेक्षा अधिक किमतीची नाही. असे असतानाही, ही वाहने अधिकच्या किमतीने खरेदी करण्यात आली आहेत.” कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी संबंधित या व्हॅनपैकी काही यंत्रे बंद पडली असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची चौकशी सुरू आहे, पण अजून अहवाल आलेला नाही. मग नेमके काय सुरू आहे?” असा सवाल वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला.

अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाचा अहवाल सभागृहात मांडला जावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी लावून धरली. यावर विधानसभा अध्यक्षांनी, या प्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्ण करून अहवाल सदनासमोर मांडण्याचे निर्देश दिले.

या आरोपांमुळे आरोग्य विभागाच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button