क्राईमभंडाराविदर्भ

कौटुंबिक वादाचा रक्तरंजित अंत! ; मुलाने फावड्याने वार करून केली वडिलांची निर्घृण हत्या

बाथरूम-शौचालयाच्या बांधकामावरून कडाक्याचे भांडण; हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा स्वतःहून पोलिसांत हजर

तुमसर : कौटुंबिक मतभेद आणि क्षणिक संतापाच्या भरात पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाचा क्रूरपणे खून केल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना तुमसर तालुक्यातील खरबी येथे घडली. घरात बाथरूम आणि शौचालयाच्या बांधकामावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट रक्तरंजित हत्याकांडात झाले. संतापाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यावर फावड्याने (कुदळ-फावडे) जोरदार प्रहार केला. हा वार वर्मी बसल्याने गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा घटनास्थळावरच तडफडून मृत्यू झाला.

ही खळबळजनक घटना शुक्रवारी (२९ मे) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तुकडू बावणे (वय ६० वर्षे) असे दुर्दैवी मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलगा गणेश तुकडू बावणे (वय ३३ वर्षे) याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत तुकडू बावणे आणि त्यांचा आरोपी मुलगा गणेश हे दोघेही खरबी येथील एकाच घरात एकत्र राहत होते. शुक्रवारी रात्री घरात शौचालय व बाथरूमच्या बांधकामाच्या विषयावरून दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. मात्र, पाहता पाहता या विषयावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. शब्दाने शब्द वाढत गेल्याने हा वाद अत्यंत तीव्र झाला आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. या भांडणादरम्यान गणेशचा स्वतःवरील ताबा सुटला. त्याने घरात बांधकामासाठी आणून ठेवलेले फावडे उचलले आणि थेट वडील तुकडू बावणे यांच्या डोक्यावर मारले. हा प्रहार इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि तुकडू यांनी जागीच प्राण सोडले.

वडील आणि काकांचे भीषण भांडण सुरू असल्याचे पाहून पुतण्या आर्यन आनंद बावणे (वय १५ वर्षे) याने धाव घेत वाद मिटविण्याचा आणि काकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंध झालेल्या आरोपी गणेशने त्यालाही सोडले नाही. त्याने पुतण्या आर्यनलाही थापडा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करून जखमी केले. कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, आरोपी गणेश हा विवाहित असून त्याला पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मृत तुकडू हे गणेशकडेच राहत होते, तर त्यांची पत्नी (आरोपीची आई) दुसऱ्या मुलाकडे वास्तव्यास आहे.

वडिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच गणेशला आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्याने तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तो कुठेही न दडता थेट मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. “मी माझ्या वडिलांचा खून केला आहे,” अशी कबुली त्याने देताच पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारही काही क्षणांसाठी अवाक् झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी तात्काळ तुमसर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. रात्री गावकऱ्यांनी मृताच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शनिवारी सकाळी शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आरोपी गणेश बावणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा (मर्डर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button