
बालदिनाच्या औचित्यावर सहायक कामगार आयुक्तांचे आवाहन; नियम मोडल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास
गोंदिया : भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य हे बालकांचे मूलभूत अधिकार आहेत. बालकांचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्व आस्थापना मालकांनी किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवता सामाजिक आणि कायद्याच्या बांधिलकीचे पालन करावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रा. मो. धुर्वे यांनी बाल दिनाच्या औचित्याने केले आहे.
बालमजुरी ही एक अनिष्ट प्रथा असून, या प्रथेविरुद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ मध्ये सुधारणा करून नियम अधिक कठोर केले आहेत. मालकाने/नियोक्ताने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यांना ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास किंवा २० हजार रुपये ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. १४ वर्षांखालील बालके: कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवण्यास संपूर्ण बंदी आहे. १४ ते १८ वर्षांखालील किशोरवयीन: धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे.
सहायक कामगार आयुक्तांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल, गॅरेज, आस्थापनाधारक, उद्योजक, बांधकाम नियोक्ते आणि विटभट्टी मालकांना बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर न ठेवण्याची सक्त सूचना केली आहे. जिल्ह्यात बालकामगार आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत सहायक कामगार आयुक्त कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



