चंद्रपूरविदर्भ

जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कारवाईला वेग; ६ महिन्यांत ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, १५८ जणांवर कारवाई

चंद्रपूर : अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी आणि जिल्ह्यात नशामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी चंद्रपूर पोलिस विभागाने कंबर कसली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी धडक मोहीम राबवत ११९ गुन्हे दाखल केले असून, १५८ संशयितांवर कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३९ लाख ५४ हजार रुपयांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पोलिस विभागाने कारवाईचा सविस्तर आढावा सादर केला. यामध्ये गांजा, एमडी पावडर आणि पॉपी स्ट्रॉ (खसखस) बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, विशेषतः अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध ९५ गुन्हे नोंदवून ११४ जणांना अटक करण्यात आली आहे.

तरुण पिढी अंमली पदार्थांकडे आकर्षित होऊ नये, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिले. तसेच, अंमली पदार्थांची विक्री वा साठवणूक होत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील रासायनिक उद्योगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि एमआयडीसीने समन्वयाने काम करावे, अशा सूचना डॉ. व्यवहारे यांनी दिल्या. तसेच, एमआयडीसी क्षेत्रातील रिकाम्या जागांचा गैरवापर टाळण्यासाठी नियमित तपासणीचे आदेश दिले आहेत. याशिवाय, वन विभाग आणि कृषी विभागाने जिल्ह्यात गांजा किंवा खसखशीची बेकायदेशीर लागवड होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 या बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुहास सावंत, उपशिक्षणाधिकारी गणेश येळणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर पोलिसांची ही धडक कारवाई जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांमध्ये भीती निर्माण करणारी ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button