
४ वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या ज्ञानेश्वर उईके यांच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते ; हलाखीच्या परिस्थितीत ‘भैसारे‘ आणि टीमचा पुढाकार
गडचिरोली : “माणुसकी अजून जिवंत आहे” याचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यातील एका संवेदनशील घटनेतून पुन्हा एकदा आला आहे. मागील चार वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या भूमिहीन कुटुंबातील ज्ञानेश्वर उईके या रुग्णाच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असली, तरी सामान्य नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून मदतीचा डोंगर उभा केला आहे.
ज्ञानेश्वर उईके यांचे कुटुंब भूमिहीन असून रोजंदारीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गंभीर आजारामुळे उपचाराचा खर्च पेलणे या कुटुंबासाठी अशक्य झाले होते. विशेष म्हणजे, या कुटुंबाने विद्यमान आमदार आणि इतर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधींकडे वारंवार मदतीची याचना केली होती. मात्र, त्यांना केवळ आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. जिथे राजकारण आणि प्रसिद्धीसाठी ‘फोटोबाजी’ केली जाते, तिथे एका गरजू रुग्णाला प्रत्यक्ष मदतीसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली, ही शोकांतिका यानिमित्ताने समोर आली आहे.
या बिकट परिस्थितीची दखल माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंधळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा समितीचे तालुका अध्यक्ष अप्रव भैसारे यांनी घेतली. कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय भैसारे यांनी स्वतः पुढाकार घेत लोकवर्गणी मोहिमेचे नेतृत्व केले आणि स्वतःही आर्थिक मदत करून समाजासमोर एक आदर्श ठेवला.
या लोकवर्गणीच्या मोहिमेत अनेक मान्यवरांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला: प्रमुख सहकार्य: समाजसेवक जीवनभाऊ नाट, चांगदेव फाये, विनोद खुणे, हेमंत सेंदरे. प्रशासकीय व शैक्षणिक स्तर: ग्रामसेवक कन्नाके सर, डोंगरवार मॅडम, देवीकर साहेब, मुख्याध्यापक लाडे सर व कर्मचारी वृंद. तरुण व सामाजिक कार्यकर्ते: भारत डोंगरे, गौरव रामटेके, गणेश भैसारे, सुरेंद्रसिंग गौतम आणि आरोग्य उपकेंद्र विभागाची टीम.
या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ज्ञानेश्वर उईके यांना आवश्यक उपचारासाठी ठोस आर्थिक आधार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम या टीमने केले आहे.
आजच्या काळात जिथे गरिबांना केवळ आश्वासने देऊन बोळवण केली जाते, तिथे आंधळी येथील नागरिकांनी एकत्र येऊन दिलेली ही मदत खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरली आहे. “गरजू आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केवळ योजनांच्या कागदांची नव्हे, तर अशा ठोस कृतीची गरज आहे,” अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.
या कौतुकास्पद कार्यामुळे अप्रव भैसारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर जिल्हभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, माणुसकीच्या या नात्यामुळे ज्ञानेश्वर उईके यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.



