
गडचिरोली पोलिसांची सलग दुसरी मोठी कारवाई
गडचिरोली : नक्षलवादाच्या नावाखाली बनावट बॅनर आणि पत्रके लावून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका टोळीचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माओवादी असल्याचे भासवून अफवा पसरवणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिपली-बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशाच प्रकारच्या कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी यशस्वी कारवाई आहे. यामुळे नक्षलवादाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या असामाजिक तत्त्वांना पोलिसांकडून स्पष्ट व कडक इशारा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी पोमके-फुलणार परिसरातील हिद्दुर-दोबुर मार्गावर दोन झाडांदरम्यान लाल रंगाचा कापडी बॅनर आणि पांढऱ्या रंगाची पत्रके आढळून आली होती. या बॅनर व पत्रकांवर माओवादी संघटनेच्या नावाने मजकूर लिहून स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही गंभीर बाब समोर येताच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष तपास पथकाची (SAT) स्थापना करण्यात आली.
तपास पथकाने स्थानिक पातळीवरील गुप्त माहिती, तांत्रिक पुरावे आणि सुगावा यांच्या आधारे वेगाने शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान जोगा रैनु धुर्वा (रा. मिरगुळवंचा), मालु कांडे धुर्वा (रा. मिरगुळवंचा), दलसु मर्रा तेलामी (रा. कृष्णार), चैतु डूंगा धुर्वा (रा. दोबुर), गणेश देवू आलामी (रा. पोयारकोठी), राजेश दल्लु वड्डे (रा. मिरगुळवंचा) हे सहा आरोपी माओवादी असल्याचे भासवून हे बेकायदेशीर कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. या सर्व सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील इतर संशयित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
या प्रकरणी कोठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांसह बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कटामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
”गडचिरोली जिल्ह्यात ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ या व्यापक मोहिमेद्वारे माओवादी कारवायांवर पूर्णपणे प्रभावी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्हा पोलीस अभिलेखावर एकही सक्रिय माओवादी शिल्लक नाही.
गडचिरोली पोलिसांनी अत्यंत कमी कालावधीत केलेल्या या सलग दोन मोठ्या कारवायांमुळे नक्षलवादाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या किंवा दहशत पसरवणाऱ्या घटकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे या कारवाईवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नागरिकांनी नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवा, भूलथापा किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नये. समाजात भीती व दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
— एम. रमेश, पोलीस अधीक्षक, गडचिरोली



