क्राईमगोंदियाविदर्भ

विद्यार्थ्याचे अपहरण करून ८८ हजार रुपयांनी लूटले

मांडोदेवी जंगलातील घटना; तीन तरुणांवर गुन्हा दाखल

गोंदिया : नागपूर जिल्ह्यातील एका इलेक्ट्रिशियन डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला अपहरण करून मांडोदेवी जंगलात नेऊन शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या खात्यातून तब्बल ८७ हजार ९१४ रुपये काढून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी आमगाव पोलिसांनी सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) रोजी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भूपेंद्र सुरज भोयर (वय १८, रा. ढोलमारा, जि. नागपूर) हा विद्यार्थी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी कामठी रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता. ट्रेन उशिरा आल्याने त्याला झोप लागली आणि तो चुकून राजनांदगाव (छत्तीसगड) येथे उतरला. ११ सप्टेंबर रोजी सकाळी त्याच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला आणि ओळखीचा असल्याचे सांगून त्याला नागपूरला बाइकने सोडतो असे सांगितले. भूपेंद्रने विश्वास ठेवल्याने तो त्या व्यक्तीसोबत निघाला. मात्र, आरोपीने त्याला मांडोदेवी जंगल परिसरात नेले, जिथे त्याचा आणखी एक साथीदार आधीच उपस्थित होता. दोघा आरोपींनी संगनमत करून भूपेंद्रला पेचकस दाखवून धमकावले आणि त्याच्याकडील मोबाईल, आधार कार्ड, एटीएम कार्ड व पासवर्ड जबरदस्तीने घेतला. आरोपी मिथुन हा एटीएम कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी गेला, तर दुसऱ्या साथीदाराने भूपेंद्रला रात्रभर जंगलात कैद ठेवले. १२ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी भूपेंद्रच्या मोबाईल सिमचा वापर करून ऑनलाईन व्यवहार केले. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याला हायवेवर सोडून आरोपी फरार झाले.

घरी पोहोचल्यावर भूपेंद्रने बँकेत तपासणी केली असता, त्याच्या खात्यात केवळ ३४ रुपये शिल्लक होते. आरोपींनी एटीएम आणि ऑनलाइन व्यवहारातून एकूण ८७ हजार ९१४ रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. भूपेंद्र भोयरच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्यायसंहिता १२६ (२), ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button