गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात ‘आकाश निरीक्षण’ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरु, शनी आणि चंद्राच्या निरीक्षणासह विश्वरचनेवर विचारमंथन ; PM-USHA अंतर्गत मिळालेल्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागाने मंगळवार, ९ डिसेंबर रोजी रात्री ८.३० ते १२.३० पर्यंत आयोजित केलेल्या आकाश निरीक्षण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दूरदर्शकामार्फत गुरु, शनी आणि चंद्र या ग्रहांचे तसेच त्यांच्या उपग्रहांचे बारकाईने निरीक्षण केले. याव्यतिरिक्त, ओरायन बेल्ट नक्षत्रातील ताऱ्यांचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी रसपूर्वक केला. केवळ निरीक्षण न करता, विद्यार्थ्यांनी ताऱ्यांमागील रहस्य, ग्रहांची निर्मिती, विश्वाची रचना व सृष्टीचा विस्तार यांसारख्या खगोलशास्त्रीय विषयांवर विचारमंथनही केले.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे मार्गदर्शन भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अपर्णा भाके, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे (PM-USHA) समन्वयक डॉ. प्रितेश जाधव, केंद्रीय उपकरण सुविधा केंद्राचे समन्वयक डॉ. नंदकिशोर मेश्राम, आणि प्रा. विकास पुनसे यांनी केले. डॉ. प्रितेश जाधव यांनी माहिती दिली की, विद्यापीठात उपलब्ध असलेले दूरदर्शक आणि वैज्ञानिक उपकरणे PM-USHA अंतर्गत मिळाली आहेत आणि भविष्यात आणखी अत्याधुनिक उपकरणे विद्यापीठाला उपलब्ध होणार आहेत.

विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने कळविले आहे की, खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयांच्या मागणीनुसार अशा प्रकारचे आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करून दिले जाऊ शकतात. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे या उपक्रमासाठी सतत मार्गदर्शन व प्रेरणा लाभत असल्याचे भौतिकशास्त्र विभागाने नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button