
गडचिरोली : शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा आणि गडचिरोली पोलीस दलाच्या पुनर्वसन प्रयत्नांचा अत्यंत सुखद परिणाम समोर आला आहे. आत्मसमर्पण केलेल्या एका माओवादी दाम्पत्याला नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. यामुळे हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततापूर्ण कौटुंबिक जीवनाची निवड केलेल्या या दाम्पत्याच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.
जिल्हा महिला सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे शुक्रवारी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, वय २५) हिची प्रसूती होऊन त्यांना मूल प्राप्त झाले. सम्मी आणि तिचा पती अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी (डिव्हीसीएम, वय ३२) यांनी ०१ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते.
नक्षलवादी दलामध्ये कार्यरत असताना सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य जगणे शक्य नव्हते, मात्र आत्मसमर्पणानंतर त्यांना हे सुख प्राप्त झाले आहे. गडचिरोली पोलीस दलाकडून ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आरोग्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि रोजगार यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून या दाम्पत्यास पुनर्वसनासाठी एकत्रितपणे १६.३ लाख रुपये निधी मिळवून देण्यात आला आहे. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, ई-श्रम कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवून देण्यात आले आहेत, ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील होऊ शकले.
गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या प्रभावी पुनर्वसन धोरणामुळे आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलासमोर एकूण ७८३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच, सन २०२५ या वर्षात आतापर्यंत एकूण १०१ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अर्जुन आणि सम्मी यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना हिंसक भूतकाळाला मागे सोडून शांतीपूर्ण आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळत असल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.



