
महाआरती आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण ; युवकांमध्ये शिवविचार रुजवण्याचा आयोजकांचा संकल्प
गडचिरोली : तालुक्यातील कोटगल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्थानिक ‘चेतन ग्राफिक्स’ आणि ‘साथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. “जय भवानी, जय शिवाजी” च्या गगनभेदी जयघोषाने कोटगल नगरी दुमदुमून गेली होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर महाराजांची सामूहिक ‘महाआरती’ संपन्न झाली. आरतीनंतर उपस्थित सर्व शिवभक्तांना ‘महाप्रसाद’ वितरित करण्यात आला. या सोहळ्यामुळे गावात एकतेचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सोहळ्याचे मुख्य आयोजक चेतन ग्राफिक्सचे मालक व साथ फाउंडेशनचे सचिव चेतन कोलते यांनी युवकांसमोर महाराजांचे विचार मांडले. आजच्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे विचार, शौर्य आणि सामाजिक एकोपा जोपासणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. साथ फाउंडेशनच्या सदस्यांनीही “महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे” असे मत व्यक्त केले.
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते मोहन ठाकरे, मनोहर दुधाबावरे, रामदास ठाकरे, शिवाजी भोयर, बालाजी कोलते, निधी अमोल गद्देवार, आकाश भोयर आणि हरिष कोलते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यासह गावातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



