चंद्रपूरविदर्भ

महावितरण कर्मचाऱ्यांचे कर्तव्यदक्ष काम; पुराच्या पाण्यातही जीवाची बाजी लावत वीजपुरवठा केला सुरळीत

चंद्रपूर: जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी (९ व १० जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले होते. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करत काही तासांतच वीजपुरवठा सुरळीत केला, यामुळे ग्राहकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

गावाभोवती पुराचे पाणी साचले असताना, विद्युत व्यवस्था सुरू राहणार की नाही, हा नागरिकांच्या मनातील एक मोठा प्रश्न होता. अनेकदा नागरिक अशा स्थितीत वीज येणार नाही असे गृहीत धरतात, कारण इतक्या खोल पाण्यात आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा कोण सुरळीत करणार, हा प्रश्न त्यांच्या मनात असतो.

परिस्थिती कशीही असो, महावितरणचे कर्मचारी अशाही स्थितीत नागरिकांना उजेडात कसे ठेवता येईल याचा आटोकाट प्रयत्न करतात. पुराच्या पाण्यातही जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम ते करतात. अशीच एक घटना गेल्या दोन दिवसांत गांगलवाडी वीज वितरण केंद्राच्या कार्यक्षेत्रात घडली आहे.

पुराच्या पाण्याखाली आलेल्या विद्युत व्यवस्थेला सुरळीत ठेवण्याचे काम महावितरणच्या गांगलवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ९ आणि १० जुलै २०२५ रोजी पूर्ण केले. बोटीच्या सहाय्याने पुराच्या ठिकाणी जाऊन बंद झालेली विद्युत वाहिनी कट करून, बाकी गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

या कामगिरीमध्ये महावितरणच्या गांगलवाडी शाखेचे अधिकारी दिनेश हनवते (सहाय्यक अभियंता), तसेच कर्मचारी बोंडे (मुख्य तंत्रज्ञ), राकेश मलोडे (वरिष्ठ तंत्रज्ञ), आकाश नखाते (वरिष्ठ यंत्रचालक), बारेवाड (यंत्रचालक), रोहित करंजीकर (तंत्रज्ञ), सूरज खोब्रागडे (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), नागदेवते (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), सचिन चहांदे (बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ), आणि अन्य गांगलवाडी वीज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यामुळे पूरस्थितीतही अनेक गावांना अखंड वीजपुरवठा मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button