
नवरात्र कथेहून परतणाऱ्या नाकाडे दांपत्यावर काळाचा घाला ; मुलावर लग्नाच्या आनंदाऐवजी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वडसा-अर्जुनी मार्गावरील तावशी फट्याजवळ सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मुखरू जीवन नाकाडे (वय ६२) आणि मालता मुखरू नाकाडे (वय ५७) (रा. टोला कोरंभी, ता. अर्जुनी मोरगाव) हे दांपत्य अर्जुनी मोरगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे नवरात्र दुर्गा पूजेनिमित्त असलेली कथा आटोपून स्वगावी परतत होते. अर्जुनी मोरगावबाहेर तावशी टी पॉईंटजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. एपी ३७ टीके १५८९) ने त्यांच्या दुचाकीला (क्र. एम एच ३५ एम ६३०१) जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मुखरू जीवन नाकाडे यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृतदेह पूर्णतः छिन्नविछिन्न झाला. ट्रक चालकाने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघातग्रस्त दुचाकी ट्रकच्या चाकात अडकल्याने त्याला पळता आले नाही. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
नाकाडे दांपत्याला तीन विवाहित मुली आणि एकुलता एक मुलगा आहे. विशेष म्हणजे, रविवार (२८ सप्टेंबर) रोजीच त्यांच्या मुलाचा साक्षगंध कार्यक्रम पार पडला होता आणि लवकरच मुलाचे लग्न होणार होते.
लग्नाच्या आनंदी वातावरणात असतानाच, मुलावर एकाच सरणावर आई-वडिलांना अग्नी देण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे टोला कोरंभी परिसरात आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात गहन शोककळा पसरली असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनेची नोंद करून पंचनामा केला असून, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.



