गडचिरोलीविदर्भ

एटापल्लीत व्यसनमुक्तीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

मुक्तीपथ तालुका स्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न

​एटापल्ली : तालुक्यातील गावे आणि शहर व्यसनमुक्त करण्यासाठी तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी विशेष पथकांद्वारे तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, वसतिगृहे आणि सरकारी कार्यालयांमध्ये व्यसन करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच अवैध विक्रेत्यांविरोधात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ अंतर्गत मोहीम राबविण्याचे आदेशित केले आहे.

एटापल्ली येथील तहसील कार्यालयात ‘मुक्तीपथ तालुका स्तरीय समन्वय समिती’ ची आढावा बैठक तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, मुक्तीपथचे किशोर मलेवार, उमेदचे तालुका व्यवस्थापक प्रमोद घटे, उपकृषी अधिकारी बी. एस. परसवार, पोलीस कर्मचारी मोहन शिंदे, समुपदेशक एस. डी. श्रीरामे, तसेच आकाश भोयर, बळवंत सूरजागडे, सुरेखा दुर्गे आणि विशाखा मूरमूरवार यांसह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आढावा घेतल्यानंतर तहसीलदार गांगुर्डे यांनी एटापल्ली शहरासह तालुक्यातील सर्व गावे पूर्णपणे दारू, तंबाखू आणि खर्रामुक्त करावीत. अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. सर्व शासकीय व खासगी कार्यालयांची पथकाद्वारे तपासणी करण्यात येईल. कार्यालयात व्यसन करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. शाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवून परिसर व्यसनमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुक्तीपथचे तालुका संघटक किशोर मलेवार यांनी गेल्या तीन महिन्यांचा प्रगती अहवाल सादर केला. यामध्ये ३४ गावांत ‘शक्तीपथ स्त्री संघटना’ बैठकांद्वारे १८६१ महिलांना मासिक पाळी, कमजोरी आणि मलेरियाबाबत मार्गदर्शन करून टॉनिकच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. १६७ शाळांमध्ये कार्यक्रम घेऊन १०,३८५ विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. पोलीस विभागाच्या सहकार्याने ७४ ठिकाणी दारूविक्रीबंदीसाठी कारवाया करण्यात आल्या. सुरजागड आणि तुमरगुंडा या यात्रा दारू-तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून, व्यसन उपचार शिबिराद्वारे २२० रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button