आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

‘निर्मल वारी’चे कौतुक आणि मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले हे मानाचे वारकरी दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी झाले होते. पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पांडुरंगाकडे राज्यावरील संकटे दूर करण्याची शक्ती, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी आणि बळीराजाला सुखी समाधानी करण्याचा आशीर्वाद मागितला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत असून, यावर्षी वारीने एक नवीन विक्रम केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला आले. दिंडीसोबत आलेल्या वारकऱ्यांबरोबरच स्वयंप्रेरणेने मोठ्या संख्येने वारकरी पायी आले, ज्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. शासन आणि प्रशासनाने वारकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरिनामाचा गजर करताना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक असल्याचे सांगून, मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘निर्मल वारी’च्या माध्यमातून अतिशय चांगल्या आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली, असे म्हटले. आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. राज्याच्या प्रगतीसाठी आध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासांनी कमी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून, वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला:
- प्रथम क्रमांक: श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा.
- द्वितीय क्रमांक: श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.
- तृतीय क्रमांक: श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.



