
विहान संस्थेच्या माध्यमातून आरोग्य मदत, लग्न समारंभ व पोलीस भरती प्रशिक्षणाचे कार्य
गडचिरोली : विहान बहुउद्देश्यीय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे आणि व्हाईस चेअरमन मनाली कबिर निकुरे या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या दांपत्याला त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘भारत गौरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी चित्रपट कलावंत महिमा चौधरी यांच्या हस्ते आणि राजिक खान सर की फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निकुरे दांपत्य विहान बहुउद्देश्यीय संस्थेच्या माध्यमातून सक्रिय सामाजिक कार्य करत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन जागतिक मानवी हक्क आयोगाने त्यांना हा सन्मान दिला आहे. त्यांनी ‘यशोदा स्वास्थ्य सहाय्यता कार्ड’ च्या माध्यमातून शालेय मुलांना असो वा दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिक, अशा सर्वांना संस्थेच्या माध्यमातून नेहमीच आर्थिक मदत केली आहे. दुर्धर आजार असलेल्या जोडप्यांचे लग्न लावून देण्यापासून ते पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्यापर्यंत विविध सामाजिक उपक्रम ते राबवतात.
या कार्याची दखल घेऊनच जागतिक मानवी हक्क आयोगाने निकुरे परिवाराला ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र निकुरे परिवाराचे कौतुक व अभिनंदन होत आहे. डॉ. अनिल रुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार, महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बणाईत, गडचिरोली जेलचे जेलर मुंगले, पोस्ट मास्तर किशोर खरडे, किया शोरूमचे बीएम गणेश कोडापे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



