गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली आता ‘स्टील हब’ होणार! : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

लोह उद्योगांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार, दरडोई उत्पन्न वाढणार; गडचिरोलीला ‘स्टील हब ऑफ इंडिया‘ बनवण्याचा संकल्प

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल आता ‘स्टील सिटी’ च्या दिशेने होत असून, येथील दलित, आदिवासी आणि अठरापगड जातीतील नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांचे जीवनमान बदलून गडचिरोलीचे परिवर्तन घडत आहे. पुढील काही वर्षांत येथील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन गडचिरोली राज्यातील पहिला जिल्हा बनवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, २२ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या (LMEL) विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात हेडरी येथील ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेडरी ते कोनसरी दरम्यानची ८५ किलोमीटर लांबीची आणि १० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइन, आणि कोनसरी येथील ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या पेलेट प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. याव्यतिरिक्त, कोनसरी येथे ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प, १०० खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली येथील लॉयड्सच्या कर्मचारी वसाहत या प्रकल्पांचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. गडचिरोलीला ‘स्टील हब ऑफ इंडिया’ बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या तुलसी मुंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, कोनसारीचे सरपंच श्रीकांत पावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात गडचिरोलीच्या विकासावर आणि ‘स्टील हब’ बनवण्याच्या स्वप्नपूर्तीवर विशेष भर दिला. ते म्हणाले, “गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलविण्याचं काम लॉयड्सच्या माध्यमातून होत आहे.” २०१६ पासून अनेक अडचणींवर मात करून येथे लोह उत्खनन सुरू झाले आहे. गडचिरोलीत लोह उत्खननासाठी परवानगी देताना, जिल्ह्याचा वसाहतीसारखा वापर होऊ नये आणि येथेच रोजगार निर्माण होऊन स्टील प्रकल्पही सुरू व्हावा, या अटींवरच परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत १४ हजार स्थानिकांना रोजगार मिळाला आहे, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंपनीत हाऊसकीपिंगपासून १२ हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंतच्या पदांवर काम करणाऱ्या महिलांचा प्रवास.

जल, जंगल, जमीन या गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यावर मुख्यमंत्र्यांनी जोर दिला. ८० किलोमीटर लांबीची स्लरी पाइपलाइन ही प्रदूषण टाळण्यास मदत करेल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ५५ टक्के घट होईल. राज्यातील पहिली आणि देशातील चौथी अशी ही स्लरी पाइपलाइन असल्याचं त्यांनी नमूद केलं. भविष्यात ई-वाहनांचा वापर आणि गॅसवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ‘ग्रीन ट्रान्सपोर्टेशन’ वर भर देऊन प्रदूषणमुक्त विकासाची ग्वाही त्यांनी दिली. पुढील दोन वर्षांत एक कोटी झाडं लावून गडचिरोलीचं वनआच्छादन वाढवण्याचं उद्दिष्टही त्यांनी सांगितले.

उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा येथेच उपलब्ध होतील याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंतचा उपचार शासनातर्फे मोफत मिळत आहे, ज्यामुळे गडचिरोलीच्या नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.

माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचं सांगत, हा बदल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून संविधान स्वीकारल्यामुळेच शक्य झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी उर्वरित माओवाद्यांना शस्त्रं खाली ठेवून संविधानाचा स्वीकार करत मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलं. बंदुकीचा माओवाद संपत असला तरी ‘शहरी माओवादा’पासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. “गडचिरोलीचा विकास सुरू झाला असताना ‘आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या’, ‘मोठ्या प्रमाणात जंगलतोड’ अशा अफवा पसरविण्यात आल्या. अशा अफवांपासून सावध राहा, कारण त्या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यासाठी पसरवल्या जातात,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोलीवरील आत्मीयतेचं कौतुक केलं. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हजारो लोकांना भेटण्याची उत्सुकता असतानाही मुख्यमंत्री गडचिरोलीत उपस्थित राहिले आणि त्यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं, हे या जिल्ह्याप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. गडचिरोली जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढवलं जात असून, पुढील पाच वर्षांत गडचिरोली इतर जिल्ह्यांपेक्षा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विकासाच्या या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button