
देवरी तालुक्यातील धोबीसराड शिवारात मध्यरात्रीची घटना ; जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले
गोंदिया : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरी तालुक्यातील धोबीसराड शिवारात ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ ते १२.३० दरम्यान भरधाव ट्रक आणि ट्रॅव्हल्सची जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ४३ प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत.
रायपूरकडून नागपूरकडे जात असलेल्या (क्रमांक सीजी १९ बी.एल. ८००१) ट्रॅव्हल्सने समोर असलेल्या ट्रक (क्रमांक सीजी ०४ ५०९६) ला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले या अपघातातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्समधील एकूण ४३ प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच देवरी पोलीस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे हलविण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.



