
सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी येथील नवीन बसस्थानकाला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बसस्थानकातील सोयी-सुविधांची दुरवस्था खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम भरत त्यांनी प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाहणीदरम्यान राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बसस्थानक परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि शौचालयांची दयनीय स्थिती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. “बसस्थानक हे तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र आहे, येथे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे,” असे त्यांनी यावेळी नमुद केले.
बसस्थानकाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आत्राम यांनी नियमित स्वच्छता: बसस्थानक परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यासाठी दररोज स्वच्छता मोहीम राबवावी. पाणी व बैठक व्यवस्था: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय आणि प्रवाशांसाठी पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध करावी. तातडीची देखभाल: बसस्थानकाच्या इमारतीची आणि परिसरातील तांत्रिक सुविधांची वेळोवेळी देखभाल करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
विशेष म्हणजे, सिरोंचा येथील हे आधुनिक बसस्थानक मंजूर करून आणण्यासाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या या वास्तूची आता योग्य देखभाल होणे आणि प्रवाशांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “केवळ इमारत उभी करणे पुरेसे नसून, तिचे व्यवस्थापन उत्तम असणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
या पाहणीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. माजी पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे आता बसस्थानकातील प्रलंबित प्रश्न सुटतील आणि प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा सिरोंचावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. या पाहणीनंतर प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत बसस्थानकाचे रूप पालटलेले दिसेल, अशी चिन्हे आहेत.



