चंद्रपूरविदर्भ

जि.प. माजी उपाध्यक्ष ॲड. गोविंदराव भेंडारकर यांचे निधन

चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील राजकारण व समाजकारणात मोठे योगदान दिलेले ज्येष्ठ नेते, कायदेतज्ज्ञ आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. गोविंदराव भेंडारकर यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मित्रपरिवार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ॲड. गोविंदराव भेंडारकर यांची ओळख उच्च विद्याविभूषित, निस्वार्थी, अभ्यासू, सुसंस्कृत आणि पुरोगामी व्यक्तिमत्त्व म्हणून होती. ते सामाजिक आणि राजकीय चळवळीत नेहमी हिरिरीने सहभागी होत असत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय भूमिका घेतली होती आणि जनसामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अथक संघर्ष केला. ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते.

भेंडारकर हे समर्पित, शांत स्वभावाचे आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्याची परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button