गडचिरोलीविदर्भ

पहिल्याच पावसात गुंडेराचा रस्ता गेला वाहून ; कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ताटीकोंडावार यांची मागणी

अहेरी : वर्षभर काम हाती न घेता पावसाळ्याच्या तोंडावर निकृष्ट दर्जाचे काम करून समस्त जनतेला अडचणीत टाकणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील गुंडेरा नाल्याजवळ पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याच्या घटनेनंतर त्यांनी ही मागणी केली आहे.

आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 6 वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. गुंडेरा येथील नाल्यावर पूल बांधण्याचे काम कंत्राटदाराने वर्षभर हाती घेतले नाही. मात्र पावसाळा तोंडावर आल्यावर घाईघाईने निकृष्ट दर्जाचे काम उरकण्यात आले. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसात गुंडेरा नाल्यावरील तात्पुरता रस्ता पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बस, प्रवासी वाहने, जड वाहने अडकून पडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना संतोष ताटीकोंडावार म्हणाले, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. 6 वर्षे उलटूनही कंत्राटदार काम पूर्ण करत नाही आणि पावसाळा सुरू झाला की जीवघेणी तात्पुरती व्यवस्था करून लोकांच्या जीवाशी खेळतो. गुंडेराचा रस्ता वाहून जाणे हे कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाचे व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण आहे. वर्षभर झोपा काढायच्या आणि पाऊस आला की रस्त्यावर माती टाकून पळ काढायचा, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

संबंधित कंत्राटदाराने शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. निकृष्ट काम करून जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारासह संबंधीत अभियंत्यांचीही चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे. अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ताटीकोंडावार यांनी यावेळी दिला.

पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नाल्याला पूर आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुग्णवाहिका, शाळेच्या बस यांनाही अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढावी लागत आहे. प्रशासनाने तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले असले तरी नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button